संगमनेर (संजय आहिरे)
याच महिना अखेरीस संगमनेर पालिकेची मुदत संपत आहे, परंतु कोविडमुळे व प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे निवडणूक पुढे ढकलली आहे. हि निवडणूक फेब्रुवारी 22 मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणूक लगबग मात्र सुरू झाली आहे. संगमनेर पालिका निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आघाडी घेत जोर बैठकांचा धडाका लावला आहे. शेजारच्या तालुक्यातून भाजपला यावेळी पुर्ण रसद मिळणार असली तरी पक्षातील अंतर्गत गटबाजी मात्र या प्रयत्नाला अडसर ठरत आहे.
राज्यात सध्या महाआघाडीचे सरकार आहे आणि संगमनेरातही अशीच महाआघाडी व्हावी यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस देव पाण्यात ठेऊन आहे. मात्र काँग्रेस त्यास फारशी अनुकूल नाही असे चित्र दिसते. मात्र ऐनवेळी अशी आघाडी झालीच तर भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे. हि शक्यता गृहीत धरून किंवा महाआघाडी झाली नाही तरी शिवसेना भाजप युती आता होणे शक्य नसल्याने भाजपने स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान पक्षात अंतर्गत गटबाजी असून हि गटबाजी थोपविण्यासाठी वरीष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला जर यश आले तर भाजप पुर्ण ताकतीने या निवडणुकीला सामोरे जाणार यात शंका नाही. भाजपकडून शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष डॉ.अशोक इथापे, व्यापारी आघाडीचे शिरीष मुळे, माजी अध्यक्ष सिताराम मोहरीकर, राम जाजू, ज्ञानेश्वर कर्पे, राजेंद्र सांगळे, राजेंद्र देशमुख, श्रीराज डेरे, दिपक भगत, जावेद जहागिरदार, सौ. मेघा भगत, राजेश चौधरी, भारत गवळी, संपत गलांडे, रोहित चौधरी यांची मोठी टिम कार्यरत आहे. त्याच बरोबर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासह अनेक हिंदूत्ववादी संघटनांचे पाठबळ पक्षासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा सोबतीला आहे. तसेच शेजारच्या लोणी व अकोलेतून पुर्ण रसद मिळणार आहे. त्यामुळे भाजपने पुर्ण ताकतीने पालिका निवडणुक लढण्याचा निर्धार केला आहे.
आजच्या घडीला कागदावर तगडी दिसणार्या भाजपच्या टिमला मात्र अंतर्गत गटबाजीचा धोका जाणवत आहे. शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले यांना मानणारा एक गट आहे तर दुसर्या गटाला त्यांचे नेतृत्व मान्य नाही. हे अनेक वेळा स्पष्टपणे समोर आले आहे. गणपुले हे आक्रमक नेतृत्व आहे, पालिका निवडणुकीचा व पालिका कारभाराचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. वकील असल्याने कायद्याचे जाणकार आहेत मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे अजून तरी त्यांचे नेतृत्व उजाळुन निघालेले नाही. मधल्या काळात व आगामी काळातही इतर पक्षातून नाराजांची फौज भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेजारील नेतृत्व प्रयत्नशील आहे. मुस्लिम हा भाजपचा पारंपरिक मतदार नाही परंतु लोणीकरांना मानणारा मोठा गट या समाजामध्ये आहे. त्याचाही फायदा करून घेण्यासाठी कट्टर हिंदूत्ववाद काहिसा बाजूला करून प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. शहरातील जवळपास सहा ते सात जागांवर या समाजाचे प्राबल्य आहे त्यामुळे सर्वांच्या नजरा या समाजाकडे आहेत. एकुणच भाजपकडून हि निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येणार आहे परंतु त्यासाठी संघटितपणे लढले तरच सत्ताधार्यांपुढे याचा निभाव लागणार आहे. अन्यथा नेहमीप्रमाणे एक दोन जागा मिळवून समझोता एक्सप्रेसवर समाधान मानावे लागणार आहे. भाजपच्या हालचालीकडे सर्वांचेच बारकाईने लक्ष आहे.