अकोले (प्रतिनिधी)
येथील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत महाविद्यालयातील सर्व संगणक संच, विद्यार्थी व शिक्षकांचे महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. या आगीत सुमारे 61 लाख रुपयांची संपत्ती जळून खाक झाली. ही घटना आज मंगळवारी पहाटे 4.30 ते 5 च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हि आग कशी लागली या बाबत तर्क वितर्क लावले जात असून अकोले पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
अकोले शहरापासून राजूर रोडवर असलेल्या अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाला पहाटेच्या दरम्यना अचानक भीषण आग लागली. या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. पहाटेची वेळ असल्याने मदत कार्य पोहचण्यास मोठा वेळ गेला. त्यानंतर अकोले नगरपंचायतच्या अग्नीशामक दलाने ही आग अटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. यात कागदपत्रे जळून खाक झाली.
या आगीत युपीएस- 3 लाख रूपये, कॉम्प्युटर-30 लाख तीस हजार, हार्डवेअर- 13 लाख 7 हजार, फर्निचर – 7 लाख 70 हजार 700, इलेक्ट्रीक फिटींग-3 लाख 80 हजार, सिव्हील वर्क- 3 लाख 24 हजार 700 असे एकूण 61 लाख 12 हजार 400 रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. तसेच सन 2002 -2003 पासूनचे आजपर्यंतचे संगणक विभागाचे विद्यापीठ व महाविद्यालयाचे सर्व निकाल, उत्तर पत्रिका, जनरल प्रकल्प, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेनंतर महाविद्यालयाचे अध्यक्ष जे.डी. आंबरे, उपाध्यक्ष मधुकर नवले, सचिव यशवंत आभाळे, भाऊसाहेब गोडसे, एस.पी. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.