संंगमनेर (प्रतिनिधी)
कोरोना महामारीने मागील अनेक महिने लॉकडाऊन व विविध निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. परिस्थिती पुर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाचे संकट निर्माण झाले. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. आणि पुन्हा एकदा खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांनी ओसंडून वाहू लागले. काही रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्यातच शासनाने नेमलेले भरारी पथक निष्क्रिय ठरल्याने सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे संगमनेरात पुन्हा एकदा कोव्हीड सेंटर सुरु करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बरोबर आज वर्षापुर्वी कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाले होते. अनेक दिवस लॉकडाऊन व त्यानंतर विविध निर्बंध यामुळे कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी झाली. त्यानंतर शासनाने सुरु केलेले कोव्हीड सेंटर, क्वारंटाईन सेंटर हळूहळू बंद केेेले. डिसेंबर-जानेवारी महिन्यात कोरोना हद्दपार होईल अशी शक्यता निर्माण झाली असतानाच फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने मोठी उसळी घेतली. टप्प्याटप्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. आणि पुन्हा एकदा कोव्हीड सेंटर व क्वारंटाईन सेंटरची गरज निर्माण झाली. दुसरीकडे कोरोना रुग्णांचे वैद्यकीय बील एक लाखाच्या पुढे गेल्यास शासनाने तयार केलेल्या भरारी पथकाच्या तपासणीनंतर हे बील घेण्याचा अधिकार संबंधीत हॉस्पिटलला देण्यात आला आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून हे रुग्ण सध्या शहरातील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याठिकाणी अनेक वेळा गरजेपेक्षा जास्त बिले रुग्णांकडून आकारली जात आहेत. त्यामुळे रुग्ण आणि हॉस्पिटल यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यातच शासनाचे भरारी पथक निष्क्रिय ठरल्याने रुग्णांना सदर जास्त बिले भरल्यावाचून गत्यंतर रहात नाही. कोरोना संकटामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची बनली आहे. त्यात हा आजार व खर्च नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अनेकांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून शासनाने ही परिस्थीती लक्षात घेता शासनाने पुन्हा एकदा कोव्हीड सेंटर सुरु करावे. तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून जास्त फी आकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.